Home वर्धा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची बोर प्रकल्पातील केजकल्चर युनिट्सची पाहणी

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची बोर प्रकल्पातील केजकल्चर युनिट्सची पाहणी

127

सेलू :–

बोर प्रकल्पात अमेय मल्टीसोल्यूशन संस्था तसेच इतर मत्स्यपालन संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या योजनेअंतर्गत १२ केजकल्चर (Cage Culture) युनिट्स सुरू करण्यात आले असून, या सर्व युनिट्सची आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली.

या पाहणीदरम्यान तहसीलदार शकुंतला पाराजे, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे, अमेय मल्टीसोल्यूशनचे संचालक मय्यक सिंग, उमेदचे निरज नखाते, अशोक मुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर आदी उपस्थित होते.

केजकल्चर युनिट्सच्या माध्यमातून परिसरातील मत्स्यपालकांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ कसा देता येईल, यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांना दिले.

सध्या बोर प्रकल्पात अमेय मल्टीसोल्यूशन व इतर संस्थांच्या माध्यमातून १२ केजकल्चर युनिट्स कार्यरत असून, प्रत्येक युनिटमधून सरासरी ३ टन मत्स्य उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे वार्षिक सुमारे ३६ लाख रुपयांचे मत्स्य उत्पादन होत आहे. हे उत्पादन आणखी वाढविण्यासाठी स्थानिक मत्स्यपालन संस्थांना शासनाच्या योजनांतर्गत अधिकाधिक लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील मत्स्यपालन क्षेत्र विस्तारासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून, महिला बचतगटांना मत्स्यपालनाकडे वळवून त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या. यासाठी जिल्हास्तरावर मत्स्य विभागाने उमेदच्या सहकार्याने कार्यशाळांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी केजकल्चरमध्ये पाळल्या जाणाऱ्या विविध मत्स्य प्रजातींबाबत माहिती घेतली. तसेच शहरात मत्स्यपालकांसाठी बाजारपेठ उपलब्ध असल्याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.