Home Breaking News जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या उभारणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या उभारणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

71

वर्धा :– तुषार रेड्डीवार 

वर्धा जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी व चाऱ्याअभावी पशुपालकांना जनावरांचे स्थलांतरण करावे लागत असल्याची बाब लक्षात घेऊन, हे स्थलांतरण थांबविण्यासाठी गावाशेजारीच पाणी व चारा उपलब्ध असलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी छावण्या उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, पाणी व चाऱ्याअभावी पशुधनाचे स्थलांतरण होऊ नये यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या उभारल्या जातात. याच धर्तीवर ज्या भागातून स्थलांतरण होते, त्या ठिकाणी कायमस्वरूपी छावण्या उभारल्यास हा प्रश्न सोडवता येईल.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात गाई व शेळ्यांचे क्लस्टर विकसित केल्यास पशुपालकांना अधिक फायदा होईल. अशा क्लस्टरसाठी पशुसंवर्धन विभागाचे आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्ह्यातील गवळाऊ या देशी गाईंची संख्या घटत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या गाईंच्या संवर्धनासाठी स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही गवळाऊ गाईंचे संवर्धन गरजेचे असल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती केली. तसेच कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे विकसित होत असलेल्या ग्रासलॅण्ड प्रकल्पाची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्ह्यातील पशुधन, दुग्धव्यवसाय व जनावरांची स्थिती याबाबत सविस्तर सादरीकरण केले. मंत्री मुंडे यांनी यावेळी पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दिव्यांगांना किसान विकास पत्र व स्कुटी वितरण

जिल्हा परिषद सेसफंड योजनेतून इयत्ता १ ते १० मधील दिव्यांग विद्यार्थीनींना २५ हजार रुपयांचे किसान विकास पत्र देण्यात येत आहे. मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना स्कुटीचे वाटपही करण्यात आले.