
वर्धा : –
आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे विकसित होत असलेले वनजल पर्यटनस्थळ हे जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनकेंद्र ठरणार असून या स्थळाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
तळेगाव गावालगत असलेल्या वनजल पर्यटनस्थळास पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुमित वानखेडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुरेश ससाने, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ. भोयर म्हणाले, ‘‘वन आणि जलपर्यटनाचा संगम असलेले हे पर्यटनस्थळ पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांसाठीही आकर्षण ठरू शकते. याच्या विकासाचा सुस्पष्ट आराखडा तयार करून भविष्यातील देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे.’’
आर्वी उपविभागात जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून येथे अनेक वनतलाव व निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गावकऱ्यांच्या सहभागातून पर्यटनस्थळ विकसित होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण तळेगावचे वनजल पर्यटनस्थळ असल्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितले. नागपूर–अमरावती महामार्गालगत असल्याने हे स्थळ प्रमुख पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तळेगाव वनजल पर्यटनस्थळ
तळेगावजवळ व राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी बोटींग, रिसॉर्ट, मेडिटेशन सेंटर, वॉटर पार्क, गार्डन, सनसेट पॉइंट, टेंट सिटी, रेस्टॉरंट व पार्किंग सुविधा प्रस्तावित आहेत. सन २०२०-२१ पासून विकासास सुरुवात झाली असून या स्थळास पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळाला आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या पुढाकाराने निधी उपलब्ध झाल्याने विकासकामांना गती मिळाली आहे.





