Home वर्धा तब्बल दहा वर्षांनंतर सेलूतील खेळाडूंना हक्काचे क्रीडा संकुल.!

तब्बल दहा वर्षांनंतर सेलूतील खेळाडूंना हक्काचे क्रीडा संकुल.!

257

अद्ययावत ट्रॅक, ओपन जिमचे काम प्रगतीपथावर; ग्रामीण खेळाडूंनाही मिळणार सुवर्णसंधी

सेलू : – तालुक्यातील खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळत असून, तब्बल दहा वर्षांनंतर हक्काचे क्रीडा संकुल साकारत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम आणि तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांच्या पुढाकाराने सेलू तालुका क्रीडा संकुलाचे काम अखेर गतीने सुरू झाले आहे.

सध्या या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर असून, खेळाडूंसाठी अद्ययावत धावण्याचा ट्रॅक आणि ओपन जिम उभारणीवर विशेष भर देण्यात येत आहे. आधुनिक सुविधा लक्षात घेऊन संकुलाची रचना करण्यात येत असल्याने भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्यासाठी हे संकुल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत तालुका क्रीडा संकुलांसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे दर्जेदार आणि टिकाऊ सुविधा उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही आता शहरांप्रमाणे सरावाची संधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, क्रीडा मार्गदर्शक सागर राऊत तसेच स्थानिक खेळाडूंनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागले आहे. अनेक अडचणींवर मात करत सुरू झालेले हे काम सेलूच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर केवळ सेलू तालुकाच नव्हे, तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंनाही आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच मिळणार आहे. त्यामुळे सेलू तालुका क्रीडा क्षेत्राच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार असल्याची भावना यानिमित्ताने क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.