
मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )
सेलू : –
दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाची उदासीनता कायम असल्याचा आरोप करत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, वर्धा यांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सेलू यांना निवेदन देऊन तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
शासनाने ऑक्टोबर २०२५ पासून दिव्यांगांना २,५०० रुपये मासिक मानधन जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात अनेकांना अजूनही केवळ १,५०० रुपयेच मिळत आहेत. याबाबत तहसील कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार संघटनेने केली.
२०१९ मध्ये जागतिक अपंग दिनी सर्व दिव्यांगांना अँड्रॉयड रेशन कार्ड तात्काळ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही अनेक दिव्यांगांचे रेशन कार्ड प्रलंबित असून, अर्जांवर निर्णय होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना वर्षानुवर्षे रखडल्या असून, निवासस्थान व इतर सोयींच्या मंजुरीवरही शिक्कामोर्तब होत नाही, अशी माहिती निवेदनात देण्यात आली.
या वेळी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, शाखा प्रमुख चिंतामण कुंभारे, तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“समस्या न सुटल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला.





