Home महाराष्ट्र हजारो भाविकांनी घेतले संत केजाजींसह विठ्ठलाचे दर्शन

हजारो भाविकांनी घेतले संत केजाजींसह विठ्ठलाचे दर्शन

260

दहिहांडी, काला व महाप्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता

सेलू :

श्रीक्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराज यांच्या ११९ व्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता मंगळवारी पारंपरिक दहिहांडी, काला व महाप्रसाद वितरणाने मोठ्या भक्तिभावात पार पडली. या वेळी सुमारे ४० हजारांहून अधिक भाविकांना पंक्ती पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

सोमवारी दिंडी-पालखी सोहळ्यानंतर मंगळवारी दुपारी १ वाजता ह.भ.प. प्रमोद ठाकरे महाराज (आळंदी) यांचे गोपालकाल्याचे कीर्तन झाले.यावेळी ज्यांचे सहकार्याने येथे या प्रशस्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराची निर्मिती झाली ते राजे रघुजी भोसले यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर मंदिरातून भजनी मंडळींसह हरिनामाचा जयघोष करीत संत केजाजी महाराजांची पालखी निघाली. या पालखी सोहळ्यात गावातील लहान बालकांसह वारकरी, महिला भगिनी तसेच विविध पेहरावातील हरीपाठ मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.

पालखीने मंदिरास प्रदक्षिणा घालून बोरगंगेच्या तीरावरून संत नामदेव महाराजांच्या समाधी स्थळी गेल्यानंतर . तेथे गोमाता मंदिराजवळ दहिहांडीचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी संत केजाजी महाराजांचे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भादंककर, सुभाष भांदककर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर गंगापूजन करून पालखी पुन्हा मंदिर परिसरात परतली.

पालखी मिरवणुकीदरम्यान टाळ-मृदंगाच्या तालावर नाचणारे वारकरी, हरिनामाचा जयघोष व भाविकांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखी सोहळ्याची सांगता होताच भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमासाठी गावातील तरुण मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले.

चिमुकले लागले महाप्रसादाचे तयारीला 

श्री संत केजाजी महाराज यांच्या 119 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त 40 हजार लोकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते या महाप्रसादाचे तयारीत महिला भगिनी सह चिमुकल्यानी हातभार लावला पोळ्यासाठी कनीक भिजवताना चिमकुले

खासदार अमर काळे यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन 

वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे यांनी संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त घोराड ला भेट देऊन विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतले यावेळी त्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत पालखी खांदा देत हरिनामाचा गजर केला