Home Breaking News संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सव घोराडमध्ये उसळला जनसागर

संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सव घोराडमध्ये उसळला जनसागर

170
Oplus_131072

‘जय केजाजी महाराज’च्या घोषणांनी दुमदुमली प्रतीपंढरी

सेलू :

विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराजांच्या ११९ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सोमवारी भव्यदिव्य दिंडी-पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विदर्भातील विविध गावांमधील ३२० हून अधिक भजनी मंडळे व हजारो भाविक सहभागी झाल्याने संपूर्ण घोराड नगरीत भक्तांचा जनसागर उसळला होता. गावात जणू भक्तीचा मळा फुलल्याचे दृश्य दिसून येत होते.

टाळ-मृदंगाच्या गजरात नाचणारे वारकरी, हरिनामाचा अखंड जयघोष आणि संत केजाजी महाराजांच्या नावाने दुमदुमलेली नगरी पाहून परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

सकाळी अकरा वाजता येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून पालखी प्रस्थान झाले. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर रथपूजनाचा सोहळा ज्ञानेश्वर महाराज भादंककर व अभ्युदय मेघे यांच्या हस्ते पार पडला. विविध मंडळांनी सजविलेले आकर्षक रथ, अश्व, बँडपथक तसेच भजनी मंडळांचा सहभाग या दिंडी सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

  • हरिनामाच्या जयघोषात पालखीने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी प्रवेश केला. तेथे पारंपरिक अश्वाचे रिंगण पार पडले. भगव्या पताका हातात घेऊन धावणारे वारकरी, विणेकरी, पखवाज वादक, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पारायण-गाथा घेऊन सहभागी झालेल्या भाविकांनी हा सोहळा अधिक भावस्पर्शी केला. हरीपाठ मंडळाच्या वतीने मानवी साखळी करून उभारलेला उंच मनोरा आणि त्यावर वाजविला जाणारा पखवाज हा क्षण उपस्थित भाविकांचे डोळे दिपवणारा ठरला.

या दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी मैदानावर महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पालखी मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून रस्त्यांची सजावट केली होती, तसेच ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी गावातील प्रमुख मार्गांवरून जात असताना नागरिकांकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

भाविकांच्या सोयीसाठी ग्रामस्थांच्या वतीने पाणी, चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत मार्गे सायंकाळी पाच वाजता दिंडी-पालखी मुख्य मंदिराजवळ पोहोचताच या भव्य सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.