
१५० पेट्या, वाहनासह २२.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वर्धा :–
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत देशी दारूने भरलेल्या १५० पेट्या, चारचाकी वाहन, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २१ जानेवारी रोजी सावंगी (मेघे) पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.
पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राहुल प्रकाश पवार हा बुलेरो पिकअप (MH-52-0026) वाहनातून तुळजापूर महामार्गाने वर्ध्याकडे देशी दारूचा साठा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंछी धाब्याजवळ नाकेबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात आली.
पंचासमक्ष तपासणीदरम्यान वाहनात १५० खोक्यांमध्ये ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ९० मि.ली. क्षमतेच्या एकूण १५ हजार देशी दारूच्या शिश्या आढळून आल्या. यासह रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दारूचा साठा कुठून आणला, याबाबत चौकशी केली असता भूषण पाटील, रा. मुकटी, जि. धुळे याने दारू पुरविल्याची माहिती आरोपीने दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसूंते तसेच शेखर डोंगरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत व राहुल लुटे यांनी केली.





