
वर्धा :
हरियाणामधील मधुबन येथे नुकत्याच झालेल्या ४७ व्या अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदार सुनेना डोंगरे हिने सुवर्णपदक पटकावले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलिस दल, नागपूर परिक्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्याचा मान अधिक उंचावला आहे.
२९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक कार्यालयात महाराष्ट्र पोलिस दलाच्या प्रतिनिधीत्व करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकप्राप्त अधिकारी, कर्मचारी, खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला.
सुनेनाच्या सुवर्ण कामगिरीबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी आणि प्रशिक्षक राजू उमरे यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
: जागतिक स्तरावरही डंका :
सुनेना डोंगरे हिने यापूर्वी अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताचा आणि महाराष्ट्र पोलिस दलाचा गौरव जागतिक स्तरावर वाढविला आहे. तिच्या या यशामागे तिची मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसून येते.





