Home महाराष्ट्र नवसाला पावणारी भोंडाई माता

नवसाला पावणारी भोंडाई माता

517

बोर अभयारण्यात नवरात्रोत्सवात होतो देवीचा जागर 

सेलू :–

चारही बाजूंनी जंगल हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंच टेकड्या अशा नयनरम्य परिसरात जंगलाच्या मध्यभागात असलेल्या भोंडाई माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळलेली असते. जंगल व्याप्त भागात असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम आहे.

तालुक्यातील बोरधरणपासून दोन किलोमिटर अंतरावर असलेले त्या जंगलात अडेगाव चाकी येथे भोंडाई मातेची पुरातन मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याचे भाविक सांगतात. मूर्ती बोरी गावाच्या गावठाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेशीवर होती. मात्र या मूर्तीची ओळख न झाल्याने व जंगलाच्या मध्यभागात असल्याने दुर्लक्षित होती. हिंगणी अडेगांव जाणार्‍या जंगलातील पायवाटेवरच ही मूर्ती असल्याने येथून आवागमन करणारे भाविक तिथे पूजा. करीत होते. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या या मूर्तीजवळ वाघ बसून पाहिल्याचे नागरिक सांगतात. आजही नवरात्री उत्सवादरम्यान येथे वाघाचे दर्शन होत असल्याचे येथे मुक्कामी असलेले भाविक सांगतात. या देवीने घोराड येथील (कै.) नारायणराव उमाटे यांना सुमारे ८० वर्षांपूर्वी वयाच्या १५ व्या वर्षी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व स्वतःची ओळख भोंडाई माता असल्याचे सांगितल्याची आख्यायिका त्यांचे कुटुंबीय सांगतात. त्यांच्याच पुढाकाराने लोक वर्गणीतून येथे मंदिराची उभारणी करण्यात आली. वर्षभरात येणार्‍या पंचमीला येथे दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. जंगलाच्या व्यापलेल्या भागात हे मंदिर असल्याने काही निवडकच भक्त येथे बैलबंडी घेऊन येत होते. येथूनच नवसाला पावणारी भोंड़ाई माता अशी ओळख झाली. ज्यांचा नवस पूर्ण झाला त्यांच्याकडून या देवीला पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याची परंपरा सुरु झाली. जंगलाच्या मध्यभागात असलेल्या भोंडाई माता मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. घोराड, बोरी व हिंगणी येथील भक्त येथे मुक्कामी असतात. या मंदिरात विजेची सोय व पक्का रस्ता नसल्याने भाविकांची गैरसोय होते. मात्र, अशाही परिस्थितीत भक्त भोंडाई मातेच्या श्रध्देपोटी खडतर वाटेतून मार्ग काढत पायदळ जाऊन दर्शन घेतात. येथे दररोज परिसरातील भजनी मंडळ देवी चा जागर करतात. यावर्षी बुधवार १ रोजी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाची सांगता महाप्रसादाने होणार आहे.

येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने बैलबंडीने धरणातील पाणी आणावे लागत होते कैलासवासी नारायणराव उमाटे यांनी घोराड व बोरी येथील ग्रामस्थांकडून देणगी जमा करून विहिरीचे खोदकाम केले. याकरिता घोराडीतील मजूर सुमारे एक महिना येथेच मुक्कामी होते. मात्र विहिरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात काळा गोटा लागल्याने अडचण निर्माण झाली होती. यावेळी भोंडाई मातेची पूजा केल्यावर त्याही परिस्थितीत विहिरीला पाणी लागल्याची आख्यायिका आहे. आजही या विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या मंदिराच्या निर्माण कार्यात बोरी येथील शरद शिनगारे, सुधीर चौधरी, श्रीकांत कोकाटे व इतर भाविकांची मोलाची मदत मिळते.

नवरात्रोत्सवात घटस्थापने पासुन बोरी येथील गजानन पेटकर रोज सकाळ- संध्याकाळ पुजा ,अर्चा, आरती करतात. भजन, होमहवन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ( नवमीला) १ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष सुधीर चौधरी, उपाध्यक्ष किशोर राऊत, सचिव श्रीकांत कोकाटे,सह सचिव राजू कुमरे , कोषाध्यक्ष मनोज करपाते, सदस्य राजेश डेकाटे, विजय धारपुरे व परिसरातील भाविकांची मोठी मदत असते.