Home महाराष्ट्र अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पुण्यातून अटक

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस पुण्यातून अटक

351

सेलू  :

सेलू येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस वर्धा पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने पुणे (हिंजेवाडी) येथून ताब्यात घेऊन अटक केली असून पीडित मुलीसुद्धा सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, अंदाजे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमाने पळवून नेली होती. त्यावरून पोलीस स्टेशन सेलू येथे अप. क्र. 87/2025, कलम 137(2) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पुढील तपासासाठी सदर गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपासासोबत खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी कुणाल उर्फ कुंदन जयसिंग चव्हाण (वय 21 वर्षे) हा हिंजेवाडी, पुणे येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीसुद्धा आरोपीसोबत आढळून आली.

आरोपीस रीतसर कायद्याप्रमाणे अटक करून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत. तर अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक  अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सुभाष राऊत, दिवाकर परिमल, पो.हवा संजय राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे, तसेच सायबर सेलचे अक्षय राऊत, गोविंद मुंडे व स्मिता महाजन यांनी मोलाची भूमिका बजावली.