Home महाराष्ट्र दारू विक्रीला विरोध करणाऱ्याचा खून

दारू विक्रीला विरोध करणाऱ्याचा खून

75

सहा आरोपींना 10 वर्षे सश्रम कारावास

वर्धा :

सेवाग्राम पोलीस ठाणे हद्दीतील येसंबा गावात दारू विक्रीला विरोध केल्यामुळे गावातील वसंतराव शिवदास थूल (वय 59) यांचा निर्दयपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी वर्धा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात लागला. न्यायमूर्ती अली यांनी सहा आरोपींना विविध कलमान्वये दहा वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

घटनेविषयी असे की, दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी आरोपी बादल उर्फ विजय सुनील पाटील हा अवैधरित्या दारू विक्रीचे काम करीत होता. त्याला मृतक वसंतराव थूल यांनी गावात दारू विकू नको असा इशारा दिला. याचा राग मनात धरून आरोपी बादल पाटील याने थूल यांच्या पोटात चाकूने वार केला. त्याचबरोबर आरोपी आकाश पाटील, स्वप्निल दुपट्टे, राजू दुपट्टे, कैलास जुनघरे व मंजुषा पाटील यांनी लाठ्या-काठ्यांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत वसंतराव थूल यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी प्रतीक वसंतराव थूल (मृतकाचा मुलगा) यांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा क्रमांक 385/2019 कलम 302, 143, 148, 149 भा. दं. सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संजय बोठे यांनी केला.

न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली :

कलम 304(2) भादंवि : प्रत्येकी 10 वर्षे सश्रम कारावास व 5000 रुपयांचा दंड.

कलम 143 भादंवि : प्रत्येकी 6 महिने सश्रम कारावास व 2000 रुपयांचा दंड.

कलम 148 भादंवि : 6 वर्षे सश्रम कारावास व 2000 रुपयांचा दंड.

सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील ठाकरे यांनी प्रभावीपणे मांडली. तर कोर्ट पॅरवी पोलीस हवालदार जितू डांगे (पोलीस स्टेशन सेवाग्राम) यांनी केली.