
वर्धा :
वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जिल्ह्यातील दारू तस्करी करणा-या गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सात आरोपींना जेरबंद केले आहे.
पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी व पथकाने नालवाडी येथील एका भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी मुख्य आरोपी शाहरूख जलील बेग (रा. राणी दुर्गावती नगर, बुरड मोहल्ला, वर्धा) व त्याचे साथीदार देशी-विदेशी दारू व बिअरच्या मोठ्या साठ्यासह पकडले गेले.
चौकशीत शाहरूख बेग याने साथीदार मनीष मनोज मसराम, बबलू दादाराव कोडापे, विष्णु नामदेव गेडाम, साहिल मिथुन पेंदाम ( सर्व रा. बुरड मोहल्ला, वर्धा ) यांच्यासह नागपूर येथील वासन वाईन शॉपमधून अवैधरित्या दारू खरेदी करून वर्ध्यात आणल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे त्याने एका अल्पवयीन मुलासही विक्रीसारख्या कामात गुंतवून घेतल्याचे निष्पन्न झाले. तसेच या अवैध धंद्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून दिल्याबद्दल मालक अजय दिवाकर घुरडे (रा. वार्ड क्र. 6, नालवाडी, वर्धा) हेदेखील आरोपी ठरले आहेत.
या कारवाईत पोलिसांनी 1800 देशी दारूच्या बाटल्या, 221 विदेशी दारूच्या बाटल्या, 240 बिअर टिन्स, 2 फ्रिज, 2 मोबाईल, इरतिगा व स्विफ्ट कार, एक अॅक्सेस 125 दुचाकी असा एकूण ₹27,67,450/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणी दारूबंदी कायदा, मोटार वाहन कायदा व बालकामगार कायद्यान्वये 07 आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. विनोद चौधरी, पो.उपनि. उमाकांत राठोड, प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, हमीद शेख, अमर लाखे, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, अमरदिप पाटील, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अखिल इंगळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक ( स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ) यांच्या पथकाने केली.





