
गहाणातील दागिन्यातही गडबड – घोटाळा, शहरात खळबळ
सेलू : –
ग्राहकांनी खरेदी केलेल्या अन् गहाणातील सोन्याच्या अलंकारात सराफा व्यावसायिकाने गडबड केल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. गहाण ठेवलेल्या दागिन्यावर अधिकची रक्कम उचल केल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. “त्या” व्यावसायिकाने गेल्या काही महिन्यांपासून शहरातून अचानक पोबारा केला. त्यामुळे ग्राहकांवर आपल्या दागिन्यांसाठी सध्या भटकंती करण्याची पाळी आलीयं.
शहरातल्या बाजार ओळीतील एका सराफा व्यावसायिकांकडे ग्राहकांनी सोन्याचे दागिने तयार करण्यापासून तर गहाण ठेवण्यापर्यंतचा आंधळा विश्वास ठेवला होता. मात्र ग्राहकांच्या विश्वासाला त्या व्यावसायिकाने चक्क हरताळचं फासला आहे. ग्राहक मोठ्या विश्वासाने त्याच्याकडे दागिने गहाण ठेवायचे आणि आपली आर्थिक गरज पूर्ण करायचे. परंतु तो शहरातीलच एका प्रतिष्ठित सावकाराकडे ते दागिने अधिकच्या म्हणजे आगाऊ रक्कमेत गहाण ठेवायचा. एका ग्राहकाने जेव्हा आपले दागिने सोडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचे बिंग फुटले आणि ग्राहकाला जबर धक्काच बसला. नऊ हजारात गहाण ठेवलेल्या कानातल्या आभूषणावर अधिकची रक्कम उचलण्यात आल्याचे त्याला कळले. याकरिता त्याला तब्बल सतरा हजारांचा भुर्दंड सहन करावा लागला. असे प्रकार शहरात अनेकांसोबत घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी फसवणूक झालेल्या पाच ग्राहकांनी पोलिसांत देखील तक्रार नोंदवली आहे.
त्या सराफा व्यावसायिकाकडे तयार करण्यात आलेल्या आभूषणात देखील मोठ्या प्रमाणात गडबड-घोटाळा असल्याचे काही महिन्यांआधी उघडकीस आले होते. यातील ग्राहकांने दागिने परत करून आपली मूळ रक्कम वापस घेतल्याचे सांगितले जाते. सदर व्यावसायिकाकडे अनेकांचे दागिने गहाण असून ते सोडविण्यासाठी सध्या ग्राहक धडपड करताहेत. परंतू ते प्रतिष्ठान सध्या बंद असून दागिण्यासाठी ग्राहकांवर भटकंती करण्याची पाळी आली आहे.
◾ सावकाराचाही सावळा – गोंधळ
सराफा व्यावसायिकाने ज्या सावकाराकडे दागिने गहाण ठेवलेत त्याने ग्राहकांकडून मुद्दल ९ हजार, उचल केलेली अधिकची रक्कम ४ हजार आणि संपूर्ण व्याज वसूल केले. ग्राहकाने न घेतलेल्या पैशासह त्यावरील व्याजाचा नाहक भुर्दंड बसल्याने ग्राहक आर्थिक अडचणीत सापडला. या सगळ्या व्यवहाराची सावकाराकडे अधिकृत नोंद देखील नाही. केवळ एका कच्च्या कागदावर सगळे सोपस्कार पार पाडले गेलेत. सराफाने कोणाचे आणि किती दागिने गहाण ठेवलेत, यासंदर्भात देखील रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे सावकाराने यावेळी बोलताना स्पष्ट केले.






