
सेलू :–
नागपूरकडून वर्धेकडे येणाऱ्या कारसमोर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळत पलटी झाल्याची घटना केळझरजवळील सामाजिक रोपवाटिकेनजीक रविवारी (दि. १२) मध्यरात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३२ वाय ४२४२ क्रमांकाची कार नागपूरकडून वर्धेकडे येत होती. केळझर येथील सामाजिक रोपवाटिकेजवळ अचानक रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकावर चढून विरुद्ध दिशेला गेली. याच वेळी नागपूरकडे जाणाऱ्या एमएच ४० सीडी ५२६४ क्रमांकाच्या ट्रकला कारची धडक बसली. धडकेनंतर कार पलटी झाली.
या अपघातात कारचालक इलाही खान (रा. पुलफैल, वर्धा), तमन्ना योगेश विश्वकर्मा (वय २७, रा. समतानगर, वर्धा), कोमल धानोरकर (वय २९, रा. वर्धा) आणि अल्फिया प्रणय फुलझेले (वय २१, रा. वरुड, वर्धा) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढले. काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला. दरम्यान, रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.
पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हा पंचनामा किरण वरभे, सचिन उपाध्ये तसेच निरंजन वरभे यांनी केला.





