
मुख्य संपादक – पंकज तडस 9975765632
वर्धा :–
दिल्ली येथे आयोजित ऑल इंडिया काँग्रेस ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनॅकोलॉजी (AICOG) या राष्ट्रीय अधिवेशनात सेवाग्राम ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकोलॉजी सोसायटी (Sewagram OBGY Society) ला सन २०२४–२०२५ साठीचा FOGSI अध्यक्षांचा मानाचा फिरता चषक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशभरात सध्या ४२५ स्त्रीरोगतज्ज्ञ सोसायटी कार्यरत असून, त्यापैकी कॅटेगरी ‘C’ मध्ये ८७ सोसायटींची नामांकने प्राप्त झाली होती. अत्यंत कठीण व स्पर्धात्मक निवड प्रक्रियेतून सेवाग्राम OBGY सोसायटीची निवड होऊन हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला.
सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. पुनम वर्मा व सचिव डॉ. शिल्पा राऊत यांच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मातृ आरोग्य, महिलांचे सर्वांगीण आरोग्य, सुरक्षित मातृत्व, जनजागृती मोहिमा, सामाजिक आरोग्य सेवा तसेच डॉक्टरांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात सोसायटीने सातत्यपूर्ण व प्रभावी योगदान दिले आहे. 
ग्रामीण व शहरी भागातील महिलांपर्यंत दर्जेदार स्त्रीरोग सेवा पोहोचवण्यासाठी सेवाग्राम OBGY सोसायटीने राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा करत FOGSI तर्फे हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान दिल्ली येथे पार पडलेल्या ऑल इंडिया गायनी कॉन्फरन्समध्ये सोसायटीच्या सचिव डॉ. शिल्पा राऊत व विभागप्रमुख डॉ. शुची जैन यांना प्रदान करण्यात आला.
या यशामुळे भविष्यातही महिलांच्या आरोग्यासाठी अधिक प्रभावी, व्यापक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.





