Home महाराष्ट्र आज दिंडी–पालखी सोहळा; समाधी मंदिरावर अश्वाचे रिंगण

आज दिंडी–पालखी सोहळा; समाधी मंदिरावर अश्वाचे रिंगण

168

मुख्य संपादक :– पंकज तडस 9975765632

घोराडमध्ये संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भक्तीचा मळा फुलणार

सेलू :

विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराजांच्या ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त आज भव्य दिंडी–पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नामदेव महाराज समाधी मंदिराजवळ पारंपरिक अश्वाचे रिंगण होणार असून हा देखणा आणि भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे.

या दिवशी मंदिर परिसरासह संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार असून सर्व प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत. सकाळी १०.३० वाजता हरीनामाच्या जयघोषात संत केजाजी महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यात घोराडसह बाहेरगावाहून आलेल्या सुमारे ३०० पेक्षा अधिक भजनी दिंड्यांचा सहभाग असणार आहे.

पालखीसमोर बँडपथक, लेझीम पथक, तसेच संत केजाजी महाराजांच्या पादुका असलेला अश्व सहभागी होणार आहे. टाळ–मृदंगाच्या तालावर नाचत, हरिनामाचा गजर करीत ही दिंडी बोरगंगेच्या तिरावरून मंदिरास प्रदक्षिणा घालून नामदेव महाराज समाधी स्थळी पोहोचणार आहे. येथे होणारे अश्वाचे रिंगण हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार असून ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

यानंतर पालखी पताकांसह गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत ग्रामपंचायत मार्गे दुपारी ४ वाजता पुन्हा मुख्य मंदिराजवळ पोहोचेल आणि या भव्य सोहळ्याची सांगता होईल. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या, स्वागतद्वारे व फुलांची सजावट करण्यात येणार आहे. भाविकांसाठी अल्पोपहार व चहापाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. टाळ–मृदंगाच्या गजरात नाचणारे वारकरी, सजलेले रस्ते आणि भक्तांचा उत्साह पाहता संपूर्ण घोराडमध्ये भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र दिसून येणार आहे.

मंगळवारी दहिहंडी काला व महाप्रसाद

मंगळवारी ( दि. २० जानेवारी ) दहिहंडी काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात गोपाल काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर पालखी गोमाता मंदिराकडे प्रस्थान करेल. तेथे दहिहंडीचा कार्यक्रम होईल. यानंतर सुमारे ३५ ते ४० हजार भाविकांना पंक्तीपद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.