Home Breaking News सेलूकरांना शुद्ध पाणीपुरवठ्याची अद्याप प्रतीक्षा..! कंत्राटदार जोमात, प्रशासन कोमात

सेलूकरांना शुद्ध पाणीपुरवठ्याची अद्याप प्रतीक्षा..! कंत्राटदार जोमात, प्रशासन कोमात

94

सेलू : –

शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, या एकमात्र उद्देशाने शासनाने 43 कोटी रुपयांची अमृत पाणी पुरवठा योजना बहाल केली. परंतु येथील मौनीबाबा प्रशासन आणि कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुदती नंतरही सदर योजना पूर्णत्वास आली नाही. त्यामुळे शहर वासियांची अद्याप शुद्ध पाणी पुरवठ्याची प्रतीक्षा कायम आहे.

सेलू शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले होते. ही बाब निदर्शनास येताच शासनाने शहर वासियांसाठी अमृत 2.0 योजने अंतर्गत 43 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. परंतु सदर कामाचे कंत्राट अक्कलशून्य गटनेत्याच्या गळ्यातील ताईत असलेल्या पेटी कंत्राटदार “राठी” नामक इसमास देण्यात आले. त्यांनी बोर धरणात उभारल्या जाणाऱ्या “जॅक वेल”चा पार सत्यानाश करून टाकला. याकरिता बोर व्याघ्र प्रकल्पातून परवानगी पेक्षा अधिक मुरुमाचे उत्त्खनन केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय बोर जलाशयातील मत्सय शेतीला बाधा पोहचवून धरणाच्या दरवाज्यापासून 500 मीटर अंतराची परवानगी असताना 350 मीटर अंतरावर “जॅक वेल” करण्याचा पराक्रम केल्याने जलसंपदा विभागाने दिलेली परवानगी नाकारण्यात आली. यातून कंत्राटदार, मुख्याधिकारी आणि गटनेता पार तोंडावर आपटलेत.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर केलेला हा उपदव्याप सदर योजनेसाठी चांगलाच बाधक ठरला. दुसरीकडे शहरात प्राकलनात नमूद असल्याप्रमाणे एकही काम करण्यात आले नसल्याची ओरड कायम आहे. पाईपलाईनच्या लेन्थ विषयी साशंकता आहे. त्यामुळे “हर घर जल” ही संकल्पना केवळ कागदावरचं राहिल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

एरव्ही प्रत्येक गोष्टीसाठी सभागृहात भांडणारे आणि झगडणारे लोकप्रतिनिधी मात्र याविषयी चक्क मूग गिळून गप्प बसलेत. त्यामुळे “प्रशासन कोमात आणि कंत्राटदार जोमात” असेच काहीसे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांना मात्र अद्याप शुद्ध पाणी पुरवठा होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

बोर जलाशयात कंत्राटदाराने उभारली जॅकवेलसाठी समाधी 

बोर जलाशयात जॅकवेलसाठी पाणी पुरवठा योजनेचे कंत्राटदार राठी यांनी अवैध मुरूम उत्तखनन करीत भली मोठी समाधी उभारली होती. यात जलसंपदा विभागाच्या परवानगीची पुंगळी करून टाकत आपल्याच मर्जीने काम सुरु करण्यात आले. याकरिता अवैध मुरूम उत्तखनन करण्यात आले आणि ते सुद्धा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मधून, त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली आणि जॅकवेल बासनात गुंडाळल्या गेली. शेवटी ती समाधी देखील त्याठिकाणाहून हटविण्याची नामुष्की कंत्राटदारावर ओढावली.