Home Breaking News चन्याच्या ढिगाला आग लावणारे दोघे अटकेत

चन्याच्या ढिगाला आग लावणारे दोघे अटकेत

331

सेलू पोलिसांची कारवाई; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

सेलू :–

तालुक्यातील मुकिंदापूर शेतशिवारात चन्याच्या ढिगाला आग लावून शेतकऱ्याचे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान करणाऱ्या दोन आरोपींना सेलू पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कांबळे (रा. वघाळा, ता. सेलू) यांनी मुकिंदापूर येथील शेतशिवारात पाच एकर शेतीमध्ये चना पिकाची लागवड केली होती. २८ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील चन्याच्या ढिगाला आग लावली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी १ मार्च २०२६ रोजी पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अमलदार विक्रम काळमेघ व रामकिसन इप्पर करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १६ मार्च २०२६ रोजी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत राहुल रमेश श्रीखंडे (वय ३४, रा. कोपरा, ता. सेलू) व मंगेश रामदास भुजाडे (वय ३४, रा. कोपरा, ता. सेलू) यांनी चन्याच्या ढिगाला आग लावल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, पोउनि प्रितम निमगडे, पोलीस अमलदार विक्रम काळमेघ व रामकिसन इप्पर यांनी केली.