Home Breaking News सेलूत भव्य राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाला प्रारंभ

सेलूत भव्य राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाला प्रारंभ

127

मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )

सेलू : –

स्व. नरहरीपंत कोटंबकार पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, गुरुवार दि. १९ मार्च रोजी होणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

झडशी–वडगाव मार्गावरील संताजी सभागृहासमोर प्रकाश खडसे, धनराज खडसे व बालू सोनटक्के यांच्या शेतात हा भव्य सोहळा रंगणार आहे. सेलूत सलग तिसऱ्या वर्षी भरत असलेल्या या शंकरपट महोत्सवात यंदा तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून स्पर्धकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

महोत्सवात ३५० फूट सेकंदाचा पट ‘अ’ व ‘ब’ गटात, तसेच १३०० फूट सेकंद व जोडदाणीचा पट अशा विविध थरारक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय धामणगाव रेल्वे येथील महिला धुरकरी श्रुती मिलिंद वाळके यांची विशेष उपस्थिती हे यंदाच्या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार अमर काळे राहणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाणे तसेच माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, महोत्सवाचा समारोप २७ मार्च रोजी होणार असून वडसा येथील एकता नाट्य रंगभूमीच्या ‘थैमान’ या नाटकाच्या दमदार सादरीकरणाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

या राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाला परिसरातील शेतकरी, बैलगाडा प्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रविंद्र कोटंबकार व शंकरपट आयोजन समिती अध्यक्ष भूषण उर्फ बंटी वाघमारे यांनी केले आहे.