
सेलू –
सेलू तालुक्यातील घोराड परिसरात अवैध सावकारकीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, स्थानिक नागरिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावातील काही सावकार नागरिकांना तातडीच्या गरजेच्या नावाखाली पैसे देत असले तरी त्यावर अवैध व प्रचंड व्याजदराने वसुली केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कुटुंबे वैद्यकीय खर्च, शेतीसाठी किंवा घरगुती गरजांसाठी सावकारांकडून पैसे घेतात. मात्र पैसे घेतल्यानंतर मूळ रकमेपेक्षा अनेक पटीने व्याज आकारले जात असून, ठरलेल्या वेळेत हप्ते न भरल्यास संबंधितांना मानसिक छळ केला जातो.
इतकेच नव्हे तर काही सावकार हप्ते थकल्यास घर, शेती किंवा इतर मालमत्तेवर कब्जा करण्याच्या धमक्या देत असल्याचेही समोर आले आहे. सततच्या या आर्थिक व मानसिक दबावामुळे काही नागरिक आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलाकडे प्रवृत्त होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात बँकिंग सुविधा मर्यादित असल्यामुळे अनेकांना सावकारांच्या दारात जावे लागते. मात्र या परिस्थितीचा फायदा घेत काही सावकार नागरिकांची अक्षरशः पिळवणूक करत असल्याचा आरोप होत आहे.
या गंभीर प्रकाराची महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अवैध सावकारकीवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी घोराड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने योग्य वेळी कारवाई न केल्यास सावकारांच्या त्रासामुळे मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.





