
सेलू :–
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आमगाव जंगली येथे आशा ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य नूतन माळवी (वर्धा) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य नूतन माळवी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना स्त्री-पुरुष समानता, महिलांचे अधिकार तसेच समाजातील महिलांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. तसेच लहान मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्साही केले. यावेळी गावातील काही उत्कृष्ट महिलांचा सन्मान करून बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस पाटील अरुणा रामेश्वर मसराम, दुर्गा नैताम, छाया कुडमेथी व शांता मसराम यांनी विशेष योगदान दिले.
या कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.





