
आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते ग्रंथ विमोचन; सप्तखंजिरीतून समाजप्रबोधन
वर्धा :–
यशवंत शिक्षण संस्था, वर्धा संचालित यशवंत ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन (अध्यापक विद्यालय), रामनगर येथे संस्थापक सचिव स्व. आप्पासाहेब कन्हाळकर यांच्या जयंतीनिमित्त व मार्गदर्शक स्व. मनोहररावजी निशाने यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त ‘स्मृती प्रेरणा गौरव–२०२६’ हा सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या ७० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडविणाऱ्या ‘अध्यापक विद्यालयाची यशोगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, डायट प्राचार्य डॉ. मंगेश घोंगरे, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र थुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात नरेंद्र थुटे यांनी संस्थेच्या सात दशकांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे शिल्पकार बनावे, असे आवाहन केले. आमदार करण देवतळे यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्राचार्य डॉ. वंदना धाबेकर व शिबिर प्रमुख प्रा. शरद फरकाडे यांचे कौतुक केले. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी यशवंत संस्थेला वर्ध्याचा शैक्षणिक मानबिंदू म्हटले.
प्राचार्य डॉ. वंदना तु. धाबेकर यांनी शिक्षणशास्त्र विषयात ‘आचार्य’ (Ph.D.) पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘शिक्षक व्यक्तिमत्व शिबिरा’अंतर्गत आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डी.एल.एड. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी नेहा व्यवहारे व द्वितीय वर्षातील इशिका साबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय कीर्तनकार प्रवीण देशमुख (सुरगाव, ता. सेलू) यांनी ‘सप्तखंजिरी’ वादनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर केला. सामाजिक मूल्ये, संस्कार व शिक्षणाचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद फरकाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राजू गलांडे यांनी केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने व राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. वंदना धाबेकर, प्रा. शरद फरकाडे व सर्व प्राध्यापक–छात्राध्यापकांनी परिश्रम घेतले.





