
सेलू :
वर्धा जिल्ह्यातील देवगाव गोसावी हद्दीत आज सकाळी धावत्या ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने आग केवळ पार्सल डब्यापुरती मर्यादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी दिल्ली ते चेन्नई दरम्यान धावणारी जीटी एक्सप्रेस नियमित वेगात असताना शेवटच्या पार्सल डब्यातून धूर निघताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ खबरदारी घेत रेल्वे प्रशासनाने गाडी थांबविण्यात आली. दरम्यान, डब्यातून ज्वाळा उसळताना दिसताच प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व रेल्वे सुरक्षा पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी परिस्थितीवर वेगाने नियंत्रण मिळवत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इतर प्रवासी डबे पूर्णतः सुरक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र पार्सल डब्यातील साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट किंवा ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू असून अधिकृत अहवालानंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.





