Home Breaking News आंघोळीला गेलेल्या इसमाचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू

आंघोळीला गेलेल्या इसमाचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू

329

सेलू :–

सेलडोह नजीक समृद्धी महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी उघडकीस आली. परशराम सीताराम कुऱ्हाडे (वय ५४ वर्ष), रा. पोहा ता. कारंजा (लाड) जि. वाशिम असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील पाच जण गेल्या पंधरा दिवसांपासून ‘रूटमार्क’च्या कामानिमित्त येथे मुक्कामी होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे परशराम कुऱ्हाडे हे आंघोळीसाठी खड्ड्याकडे गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. खड्ड्याजवळ त्यांचे कपडे आढळून आले.

यानंतर रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता संबंधित इसम खड्ड्याकडे जाताना व पाण्यात उडी घेताना दिसून आले. तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. गळ टाकून शोध घेतल्यानंतर सकाळी सुमारे साडेअकरा वाजता त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती सेलडोह येथील पोलिस पाटील योगेश कोवते यांनी सिंदी (रेल्वे) पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिंदी पोलिस स्टेशनचे पीएसआय ओम कळेगुरवार, जमादार संतोष कोवे व शिपाई समीर आगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहेत.