Home Breaking News श्री विठ्ठल–रुक्मिणी देवस्थानातील शिवलिंग चोरी; घोराडमध्ये खळबळ

श्री विठ्ठल–रुक्मिणी देवस्थानातील शिवलिंग चोरी; घोराडमध्ये खळबळ

528

सेलू :–

विदर्भातील दुसरे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर परिसरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील महादेव मंदिरालगत असलेल्या भुयारात स्थापित केलेले शिवलिंग गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून देवस्थानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजाअर्चेसाठी गेलेल्या पुजाऱ्यांना भुयारातील शिवलिंग दिसून न आल्याने ही बाब उघडकीस आली. यानंतर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे नुकताच श्री संत केजाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला होता. पाक्षाळ पूजेनंतर रात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मंदिराच्या भुयारात साधारण चार फूट लांबीच्या शिवपिंडीवर दोन फूट उंचीचे शिवलिंग स्थापित होते. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रात्री गस्तीसाठी दोन पगारदार पहारेकरी असतानाही ही घटना घडल्याने सुरक्षेतील हलगर्जीपणा समोर आला आहे. काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना संबंधित व्यक्ती ही गावातील मनोरुग्ण असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, देवस्थानच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तीनपैकी केवळ दोनच ट्रस्टी कारभार पाहत असून व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. मंदिराचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू असून बेशिस्त व्यवस्थापनामुळेच अशी गंभीर घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.