
केळझरमध्ये हजारो भाविक दाखल
सेलू :
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्धा–नागपूर मार्गावरील केळझर येथे आज (दि. २३ जानेवारी) भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यामुळे एकचक्रीनगर भक्तीरसात दुमदुमून जाणार आहे.
पांडवकालीन ऐतिहासिक सिद्धीविनायक गणपती देवस्थानच्या वतीने गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सवानिमित्त दिंडी सोहळा तसेच काला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्यात जिल्ह्यातील शेकडो भजन मंडळांचा सहभाग असून हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक काल रात्रीपासूनच केळझरमध्ये दाखल झाले आहेत.
आज दुपारी बारा वाजता सिद्धीविनायक मंदिरातून टाळ–मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भजनी मंडळींच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी केळझरकरांनी स्वागत कमानी उभारल्या असून रंगीत रांगोळींनी संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला आहे.
१५ ते २३ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या भागवत कथाकथनाचे प्रवचन ह.भ.प. पांडुरंग सायंकार महाराज यांनी केले. १५ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता तहसीलदार सेलू डॉ. शकुंतला पाराजे व मंदिर समितीचे अध्यक्ष माधव ईरुटकर यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. दि. २३ रोजी पहाटे ५ वाजता विजयबाबू मुरारका (नागपूर) व मंदिर सचिव सुभाष तेलरांधे यांच्या हस्ते श्री गणेश व महालक्ष्मीचा अभिषेक होणार आहे.
सात दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविक भक्तीरसाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. काला व दहिहांडी निमित्त आज सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन ह.भ.प. पांडुरंग सायंकार महाराज व त्यांचा संच सादर करणार असून दुपारी २ वाजता दहिहांडी कार्यक्रमानंतर महाप्रसादास प्रारंभ होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष माधव ईरुटकर, सचिव सुभाष तेलरांधे यांच्यासह महादेव कापसे, गजानन नरड, रामचंद्र इंगोले, अनिल तेलरांधे, महेंद्र घवघवे, किशोर महाजन व अमोल जोगे यांनी केले आहे.
गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सवानिमित्त पुजारी राममूरत मिश्रा यांच्या हस्ते सकाळ–संध्याकाळ पूजा व आरती सुरू असून, दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त मंदिर सदस्य अनिल तेलरांधे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.





