Home वर्धा गंगातीरी संत केजाजी महाराजांचा महानिर्वाण दिन; ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीपूजन

गंगातीरी संत केजाजी महाराजांचा महानिर्वाण दिन; ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीपूजन

202

प्रयागराज येथील समाधीस्थळी संत केजाजी महाराजांचा महानिर्वाण दिन साजरा

सेलू :

विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथील संत केजाजी महाराजांचा महानिर्वाण दिन प्रयागराज येथील त्यांच्या समाधीस्थळी मौनी अमावस्येच्या पर्वावर भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी घोराड येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत केजाजी महाराज मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले असता, दि. १४ जानेवारी १९०७ रोजी त्यांनी तेथे देह ठेवला. दारागंज परिसरात गंगानदीच्या तिरावर असलेल्या भोसले वाड्यात त्यांची समाधी असून, त्या ठिकाणी नियमित पूजाअर्चा केली जाते.

यंदा संत केजाजी महाराजांची ११९ वी पुण्यतिथी असून, घोराड येथे हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महानिर्वाण दिनानिमित्त दि. १८ जानेवारी रोजी घोराड येथील भाविकांनी प्रयागराज येथे जाऊन समाधीचे दर्शन घेतले व महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी मंदिराचे पुजारी दिनकर जोशी, दामोदर जोशी यांच्या उपस्थितीत समाधीपूजन व आरती करण्यात आली. कार्यक्रमास घोराड येथील पत्रकार तथा माजी पोलीस पाटील संजय धोंगडे, पत्रकार पंकज तडस, संतोष तडस यांच्यासह इतर भाविक उपस्थित होते.