
बॉलिंग स्किल गेम पॉर्लरच्या आड जुगार खेळवणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
वर्धा :
बॉलिंग स्किल व्हिडीओ गेम पॉर्लरच्या आड जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी धडक कारवाई करीत मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. ही कारवाई शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली.
माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा शहरातील वर्धा रेल्वे स्टेशन समोरील दुकानदारांच्या वर्दळीच्या परिसरात छापा टाकला. नवदुर्गा बॉलिंग अली स्किल व्हिडीओ गेम पॉर्लरमध्ये गेमच्या माध्यमातून जुगार खेळवला जात असल्याचे उघडकीस आले. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने जुगाराचा हार-जीत व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान जुगार खेळवणारे नोकर तसेच ग्राहक असे एकूण १० आरोपी ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून प्लास्टिकचे कार्ड, विविध रंगांच्या चौक्यांचा लाकडी पाटा, जुगाराची नगदी रक्कम, दोन संगणक, प्रिंटर, स्कॅनर, टेबलसह एकूण ७६,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भारत कमलाकर आमले (वय ४०), संदीपलाल ईंद्रपाल उर्फ डोमारे (वय ३०), प्रतीक मनोहर खोंडागडे (वय ५४), विकांत चंद्रशेखर समर्थ (वय ४८), इरफान सैय्यद महमूद (वय ४४), लतारी राघव आम्राम (वय ५१), संदीप राजुजी आम्राम (वय ३४), सागर सुरेश जाधव (वय २५), जितेंद्र विश्वनाथ आडे (वय ३२) व नेल्सन अलेक्झांडर डिक्स (वय ५१) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. शहरात जुगार व्यवसायावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.





