
वर्धा :–
शहरात व्हिडिओ गेम पार्लरच्या आड लपून सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत संपूर्ण जुगार रॅकेटचा भंडाफोड केला. या कारवाईत जुगार खेळणारे ग्राहक, कर्मचारी व पार्लर मालकासह एकूण १९ जणांना पोलिसांनी आरोपी केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली. वर्धा रेल्वे स्टेशन परिसरातील आठवडी बाजाराजवळील एका दुकानात व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने अचानक छापा टाकला.
छाप्यावेळी आरोपी जुगारात गुंग असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून ३५ इलेक्ट्रॉनिक जुगार मशीन, प्लास्टिक टोकन्स तसेच जुगारातून मिळालेली ६८ हजार ५६० रुपयांची रोकड असा एकूण ७ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी व्हिडिओ गेम पार्लरचा मालक धनराज खेरकार याच्यासह १९ जणांविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. शहरात बेकायदेशीर जुगार चालविणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.





