Home वर्धा केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आजपासून; घोराड येथे भक्तिमय वातावरण

केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आजपासून; घोराड येथे भक्तिमय वातावरण

60

सेलू :

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या घोराड येथील श्री संत केजाजी महाराज यांच्या ११९ व्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून दहा दिवसांचा भव्य धार्मिक महोत्सव सुरू होत आहे. या निमित्ताने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीने मांडवळी सजणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पहाटे काकड आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी श्री माऊली हरिपाठ तसेच रात्री संगीतबद्ध रामायण कथा आयोजित करण्यात आली आहे. १८ जानेवारी रोजी विष्णुसहस्रनाम स्तोत्र, संत केजाजी महाराज महिमा पारायण, समाधी अभिषेक व दीपोत्सव होणार आहे. १९ जानेवारी रोजी भजन, दिंडी, पालखी व रिंगण सोहळा पार पडणार असून, २० जानेवारीला काल्याचा कार्यक्रम, दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे.

महोत्सवानिमित्त मंदिर परिसरासह संपूर्ण गाव आकर्षक विद्युत रोषणाई, तोरणे व पताकांनी सजविण्यात आले आहे. गावातील प्रमुख रस्ते रंगीत रोषणाईने उजळून निघाले असून, भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

संत केजाजी महाराज हे थोर संत म्हणून ओळखले जातात. राम, कृष्ण व हरि नामाच्या अखंड जपातून त्यांनी भक्तीचा प्रसार केला. भक्तांच्या अडचणी सोडवून अनेक चमत्कार घडविल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जातो.

महोत्सव काळात गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ व भाविक एकत्र येऊन उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत केजाजी महाराजांच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.