
वर्धा :–
जिल्ह्यात अवैध दारू: विक्री साठवणूक व निर्मिती करणाऱ्यांविरोधात वर्धा जिल्हातील पोलिसांनी एकाच दिवशी राबविलेल्या ‘वॉशआऊट’ विशेष मोहिमेत दारू माफियांवर जोरदार घाव घातला आहे. या धडक कारवाईत एकूण १२६ गुन्हे दाखल करण्यात येऊन सुमारे १२ कोटी २१ लाख रुपयांचा अवैध दारूसाठा व मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील शहरी भाग, ग्रामीण परिसर, गावाबाहेरील शिवारे, जंगल परिसर तसेच जाण्या-येण्याच्या अडगळीच्या ठिकाणी अवैध दारू तयार व साठवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेसाठी जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व विविध शाखांतील एकूण ३७० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्वतंत्र पथके तयार करून पहाटे ४ वाजल्यापासून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान १३२ आरोपींविरोधात १२६ गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच नवीन फौजदारी कायद्यानुसार ‘ई-साक्ष (E-Sakshya) अॅप्लिकेशन’ चा वापर करून पंचनामे व तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले.
पुढेही कारवाई सुरूच राहणार पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, वर्धा जिल्ह्यात अवैध दारूविक्रीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. समाजातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच अचानक व कठोर मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येतील.
या एकाच दिवशीच्या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यात पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.





