Home वर्धा शालेय राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचा थरार; सेलू नगरीत क्रीडापर्व

शालेय राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचा थरार; सेलू नगरीत क्रीडापर्व

157

दीपचंद चौधरी विद्यालय येथे शालेय राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेचा थरार; सेलू नगरीत क्रीडापर्व

राज्यातील नामांकित ७ विभागांचे संघ आमनेसामने; खेळाडूंमध्ये उत्साह

सेलू :–

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशन आणि सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू दीपचंद चौधरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू येथे भव्य राज्यस्तरीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमुळे सेलू नगरीत क्रीडापर्व साजरे होत आहे.

शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे व मुंबई या सात प्रमुख विभागांतील संघ सहभागी होत असून, विजेतेपदासाठी चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करत मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, उत्कंठावर्धक सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

या उद्घाटन समारंभाला पालकमंत्री डॉ पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार, सेलू शिक्षण मंडळाचे नविनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे (वंजारी) सह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, शिक्षकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, शिस्त व खिलाडूवृत्ती वाढीस लागावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे संयोजक सागर राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव अनंत भाकरे, सूर्यधरम स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष रामप्रसाद लिल्हारे आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

आयोजन समितीच्या वतीने क्रीडाप्रेमी नागरिकांनी या क्रीडा सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.