
सेलू :-
सेलू तालुक्यातील वडगाव परिसरात माकडांच्या टोळीने अक्षरशः हैदोस घातला असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत माकडांचा उपद्रव सुरू असून, घरांच्या छपरांवर, शेतातील झाडांवर, तसेच अंगणात येऊन ते वस्तूंचे नुकसान करीत आहेत.
ग्रामस्थांनी या संदर्भात वन विभागाकडे तक्रार नोंदविली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी “हा विषय आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, पोलिसांकडे जा” असा सल्ला दिल्याचे समजते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा स्वर उमटला आहे.
गावातील महिला व लहान मुलांना बाहेर पडणे धोक्याचे झाले असून, काही ठिकाणी माकडांनी घरातील अन्नधान्य व कपडेही ओढून नेल्याचे प्रकार घडले आहेत.
ग्रामस्थांनी वन विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून माकडांच्या या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी केली आहे.





