
वर्धा :
दिवाळीचा सण आनंद, प्रेम आणि कृतज्ञतेचा — हे प्रत्यक्षात उतरवत मातोश्री वृद्धाश्रमात यंदा दिवाळी साजरी करण्यात आली.
दिनांक 20 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध व्यावसायिक तथा समाजसेवक महेश गुल्हाणे यांच्या कृष्णगिरी परिवाराच्या वतीने वृद्ध आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
या प्रसंगी वृद्धाश्रमातील रहिवाशांना नवीन कपडे देण्यात आले तसेच गोडधोड जेवणाची व्यवस्था करून सणाचा आनंद वृद्धांसोबत वाटण्यात आला.
कृष्णगिरी परिवारातर्फे हा सामाजिक उपक्रम मागील 20–21 वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून, यंदा या कार्यात गुल्हाणे यांच्या मुलांसह पुढील पिढीनेही सहभाग घेत वृद्ध आजी-आजोबांचा आशीर्वाद घेतला.
या कार्यक्रमाला कृष्णगिरी परिवारातील सदस्य, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर सगळ्यांच्या मनात समाधानाची भावना होती.
सामाजिक जाणीव कुटुंबीय ऐक्य आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला.
यावेळी कृष्णगीरी परिवारातील श्री महेश गुल्हाने, श्री अनिल गुल्हाने, श्री प्रमोद श्रीराव, श्री राहुल शर्मा, श्री योगेश गावंडे, श्री संदीप चिचाटे, श्री अनिल नरेडी, श्री आशिष आकरे, श्री किशोर सुरकार, श्री दीपक मांडोकार, श्री गजानन वांढरे, आणि इतर कृष्णगीरी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
“वृद्ध आई-वडील हेच आपले दैवत” – महेश गुल्हाणे
महेश गुल्हाणे म्हणाले “आई-वडील हेच आपले दैवत आहेत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याऐवजी त्यांच्या सेवेत आनंद मानला पाहिजे. मागील 20 वर्षांत वृद्धाश्रमातील रहिवाशांची संख्या 100 वरून आता 18 इतकी झाली आहे; लवकरच हा आकडा शून्यावर यावा, हीच आमची इच्छा आहे. ”ते पुढे म्हणाले, “ही दिवाळी मात्र शेतकऱ्यांसाठी कठीण आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. देव त्यांना लवकरच या संकटातून मुक्त करो, हीच आमची प्रार्थना असल्याचे मत महेश गुल्हाणे यांनी व्यक्त केले.





