Home Breaking News नळाच्या पाण्यात ‘नारू’; रेहकी कला ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

नळाच्या पाण्यात ‘नारू’; रेहकी कला ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

406

सेलू : –

तालुक्यातील रेहकी कला येथे नळयोजनेच्या पाण्याबाबत गंभीर प्रकार समोर आला असून वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी अमोल निळकंठ धानकुटे यांच्या घरी भरलेल्या पाण्याच्या बादलीत नारू आढळल्याची घटना बुधवारी (दि. ११ मार्च) दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धानकुटे यांच्या घरी नळयोजनेतून येणारे पाणी बादलीत भरत असताना त्यामध्ये नारू असल्याचे दिसून आले. पिण्याच्या पाण्यात अशा प्रकारचा जीव आढळल्याने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित पाण्याचा स्रोत, टाकीची स्वच्छता आणि नळयोजनेची देखभाल याबाबत गंभीर निष्काळजीपणा झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

रेहकी कला ग्रामपंचायत सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही पाणीपुरवठ्याच्या कथित गलथान कारभारामुळे गावात अतिसाराचा प्रादुर्भाव झाल्याची घटना घडली होती. त्यावेळीही या प्रकरणाची चौकशी होऊन ग्रामपंचायतीच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले होते.

दरम्यान, पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व सुरक्षितता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.