Home महाराष्ट्र चित्रकलेतून संस्कृती, श्रद्धा व सर्जनशीलतेचे दर्शन

चित्रकलेतून संस्कृती, श्रद्धा व सर्जनशीलतेचे दर्शन

303

घोराड येथील रूचीरा धोंगडेचा उपक्रम 

सेलू :–

सेलू तालुक्यातील घोराड येथील इयत्ता 11 व्या वर्गात शिकणार्‍या रुचिरा अजय धोंगडे हिने आपल्या अप्रतिम चित्रकलेतून संस्कृती, श्रद्धा व आधुनिक सर्जनशीलतेचा सुंदर संगम साकारला आहे. तिने तयार केलेल्या विविध छायाचित्रांतून भारतीय परंपरा, धार्मिक भावना तसेच समकालीन कलाशैली प्रभावीपणे मांडली आहे.

रुचिरा हिने साकारलेल्या चित्रांमध्ये राजदरबारी दृश्य, भक्तिभावाने नटलेली देवतांची रूपे, भगवान श्री गणेशांचे रंगीबेरंगी आधुनिक चित्रण तसेच लोकप्रिय अ‍ॅनिमे शैलीतील कलाकृतींचा समावेश आहे. प्रत्येक चित्रात रंगसंगती, रेखाटनातील अचूकता आणि भावभावनांची अभिव्यक्ती ठळकपणे दिसून येते.

विशेषतः गणेशचित्रात आधुनिक आणि पारंपरिक शैलीचे मिश्रण लक्षवेधी ठरते. तर ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रांमधून मराठी संस्कृतीची समृद्ध परंपरा अधोरेखित होते. या कलाकृतींमधून रुचिरा धोंगडे हिची कल्पकता, मेहनत आणि कलात्मक दृष्टी स्पष्टपणे जाणवते.

ग्रामीण भागातील एका तरुण कलाकाराने कोणतेही शिक्षण प्रशिक्षण न घेता केलेली ही उल्लेखनीय कामगिरी निश्चितच प्रेरणादायी असून, भविष्यात ती कला क्षेत्रात मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.