
महाशांती पूजेने झाला शुभारंभ; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
सेलू :–
‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हिंगणी येथील सुभेदार वाडी येथे श्री संत गजानन महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी मंदिरासाठी नियोजित जागेवर महाशांती पूजा मोठ्या उत्साहात पार पडली.
या धार्मिक सोहळ्यासाठी हिंगणी तसेच परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. विधिवत पूजन, मंत्रोच्चार आणि नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उपस्थितांच्या साक्षीने महायज्ञही संपन्न झाला. लवकरच मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेली भूमी
हिंगणी नगरीला संत गजानन महाराजांच्या वास्तव्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या माहितीनुसार, महाराज सुभेदार वाडीत वास्तव्यास होते. त्यांनी तत्कालीन सुभेदार गणेश यादव यांना आशीर्वाद दिल्याची श्रद्धा आहे.
तसेच श्री गजानन विजय ग्रंथाच्या २० व्या अध्यायातील ७५ वी ओवी या घटनेची साक्ष देत असल्याचे मानले जाते. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य मंदिर साकारत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या मते, सुभेदार वाडीतील हे प्रस्तावित मंदिर भविष्यात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.





