Home Breaking News १ कोटींच्या निधीतून आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण; हिंगणघाटात लोकार्पण

१ कोटींच्या निधीतून आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण; हिंगणघाटात लोकार्पण

165

हिंगणघाट : ( आशिष घवघवे )

शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे १ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, खासदार अमर काळे, नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत पुतळा परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. आधुनिक प्रकाशयोजना, स्वच्छता व्यवस्था, हरितीकरण, पादचारी मार्ग आणि नागरिकांसाठी बसण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसर अधिक देखणा व सुटसुटीत झाला आहे.

हा परिसर सामाजिक प्रेरणेचे केंद्र ठरणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यास मदत होणार आहे. विशेषतः युवकांना प्रेरणा देणारे हे ठिकाण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मंत्री संजय शिरसाट यांनी हिंगणघाटच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले. पालकमंत्री पंकज भोयर यांनीही विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आमदार समीर कुणावार यांनी जनतेच्या विश्वासाबद्दल आभार मानत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगही लाभला. गायक राहुल साठे यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थित नागरिकांना भारावून टाकले.

या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांच्या जीवनमानातही सुधारणा होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.