Home Breaking News मोबाईल हिसकल्याच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचून ठार, एकास अटक

मोबाईल हिसकल्याच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचून ठार, एकास अटक

621

सेलू :

किरकोळ मोबाईल हिसकल्याच्या वादातून उफाळलेल्या रागाने २० वर्षीय युवकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकून देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत युवकाचे नाव प्रविण योगीराज राऊत (वय २०, रा. बेलगाव) असे असून तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शुक्रवारी (ता. १०) सेलू पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, शनिवारी सकाळी शहरातील विश्रामगृहाच्या मागील भागातील बोर नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ओळख पटविल्यानंतर तो प्रविण राऊत याचाच असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याचा मित्र सुरज रमेश ढगे (वय २०) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत मोबाईल हिसकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे उघड झाले. या वादाचा राग मनात धरून सुरज ढगे याने प्रवीणवर दगडाने हल्ला करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.

हत्या केल्यानंतर मृतदेह स्मशानभूमी परिसरातील डोहात फेकून दिल्याचेही आरोपीने सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

या घटनेमुळे सेलू शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सेलू पोलिसांकडून सुरू आहे.