Home Breaking News हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई; २२.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट पोलिसांची दारूबंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई; २२.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

161

हिंगणघाट : ( आशिष घवघवे )

हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पथकाने दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत तब्बल २२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १० एप्रिल २०२६ रोजी पहाटे १.०० ते २.२० वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट येथे करण्यात आली.

या प्रकरणी अप.क्र. 506/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(e), 77(a), 83 तसेच मोटार वाहन कायदा कलम 130/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक अनिल शिवराम राऊत (वय ४६), ठाणेदार, पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी MH-05-CV-6331 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी व देशी दारू आढळून आली. यात रॉयल स्टॅग कंपनीच्या २ लिटरच्या ४८ बाटल्या (एकूण किंमत १,४४,००० रुपये) तसेच रॉकेट कंपनीच्या संत्रा देशी दारूच्या ९० एमएलच्या ६,५०० बाटल्या (एकूण किंमत ६,५०,००० रुपये) असा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित स्कॉर्पिओ वाहन (अंदाजे किंमत १५,००,००० रुपये) जप्त करण्यात आले आहे.

एकूण २२,९४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा म.पो.हवा. किशोर गाडीवान (ब.नं. ८८८) यांनी दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल राऊत यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सपोनी दीपक वानखेडे, पो.उपनि. महेश इटकल तसेच पोलीस कर्मचारी अनिल केकतपुरे, दिलीप पवार, प्रवीण बोधाने, कृष्णा माने, प्रमोद दडमल, सागर समृतवार व मंगेश वाघमारे यांचा सहभाग होता.