
सिंदी सहकारी खरेदी-विक्री सोसायटीत बिबट्याचा मुक्काम, बघ्यांची गर्दी.!!
सेलू : –
शहरातील सिंदी सहकारी खरेदी-विक्री सोसायटीच्या आवारात आज बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास बिबट्या दिसून आल्याची घटना घडली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या झाडीमध्ये हालचाल दिसून आल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर लक्षपूर्वक पाहिले असता बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती तात्काळ वनविभागासह पोलीस प्रशासनाला देण्यात आली.
सेलू वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके आपल्या संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आणि पोलीस विभागाने संपूर्ण परिसर आपल्या बंदोबस्तात घेतला. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत व सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात पुढील कार्यवाही वनविभागामार्फत सुरू आहे.





