Home Breaking News बंद घरावर चोरट्यांचा धाडसी हल्ला; घोराडमध्ये भीतीचं वातावरण

बंद घरावर चोरट्यांचा धाडसी हल्ला; घोराडमध्ये भीतीचं वातावरण

529
Oplus_131072

सेलू :–

घोराड–हिंगणी मार्गालगत शेतात वास्तव्यास असलेल्या वसंता तळवेकर यांच्या बंद घरावर शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत अंदाजे ५० ते ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घोराड परिसरात उघडकीस आली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माहितीनुसार, तळवेकर कुटुंबाचे शेतात बांधलेले घर अनेक वर्षांपासून राहण्याकरिता वापरले जाते. मात्र घटनेच्या दिवशी वसंता तळवेकर हे घरी नसल्याने घरावर कुलूप होते. चोरट्यांनी बंद घराची निवड करून मध्यरात्री कुलूप तोडत आत प्रवेश केला.

    अस्थाव्यस्थ पडलेले घरातील वस्तू 

दरम्यान, शेजारी वास्तव्यास असलेल्या तळवेकर यांच्या चुलत भावाला दार ठोठावल्याचा आवाज ऐकू आल्याने ते बाहेर आले. त्यांना खाकी पँट व तोंडाला मफलर बांधलेला संशयित इसम दिसला. हटकले असता त्याने “आम्ही पोलिस आहोत, तपासासाठी आलो आहोत” अशी दिशाभूल करणारी माहिती दिली व घरात जाण्यास सांगितले. त्याच्यासोबत इतर तीन इसम असल्याचेही त्यांनी पाहिले.

शेजारी घरात जाताच चोरट्यांनी त्यांच्या दारावरही ठोठावले, तेव्हा काहीतरी अघटीत घडत असल्याची खात्री झाल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. परंतु, तोपर्यंत चोरटे वाहनासह पसार झाले होते. घरात प्रवेश करताना चोरट्यांनी साहित्याची नासधूस केली असून घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले.

घटनेची तक्रार सेलू पोलिसात दाखल करण्यात आली. घटनास्थळी श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला.

अलीकडे बंद घरांना टार्गेट करून चोरट्यांचा वाढता धुमाकूळ पाहता शेतशिवार परिसरही असुरक्षित बनला आहे. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.