
दहावीच्या यशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा मूलमंत्र
सेलू :–
दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्त या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्चित मिळते, असा मूलमंत्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला.
येथील दीपचंद चौधरी विद्यालयात दहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सौ. कल्पना मकरंदे होत्या. पर्यवेक्षक जी. बी. खंडागळे व एच. जे. मुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत चव्हाण, नितीन वांदिले व हेमंत घोडमारे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. प्रशांत चव्हाण यांनी अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक, नियमित उजळणी, लेखन सराव व ताणतणावमुक्त अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट केले. मोबाईल व टीव्हीचा मर्यादित वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
नितीन वांदिले यांनी सर्व विषयांचा संतुलित अभ्यास करण्यावर भर देत शासकीय कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ. मकरंदे यांनी शिस्त, स्वच्छता, आरोग्य आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा व शिक्षक कायम पाठिंबा देतील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती लोडे, विजया कुकडे, मिथुन हांडे व सुभाष कोवे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रवीण घोडखांदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास खैरकर यांनी मानले.





