
सेलू :–
सेलू तालुक्यातील गरमसूर येथील ग्रामस्थांनी पुनर्वसन प्रक्रियेत घर व शेतीच्या मूल्यांकनात झालेल्या त्रुटींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रूपेश खेडकर यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधित चुका तात्काळ दुरुस्त करून योग्य दराने मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुनर्वसनासाठी १८ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या पॅकेजसह जागेच्या मूल्यांकनासाठी वनविभागाच्या पथकाने आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका आणि ७/१२ उतारा यांसारखी कागदपत्रे मागवली होती. मात्र, नव्या सर्वेक्षणानुसार ७/१२ उताऱ्यात दुरुस्ती झाल्याने शासनाकडून जुना ७/१२ ग्राह्य धरला जात नसल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत.
ग्रामपंचायतीकडे धाव घेतली असता, ग्रामसेवकांकडून विविध करांची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित क्षेत्रात अधिसूचना लागू झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त स्थितीत असताना हे कर कोणत्या निधीत जमा होणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाने या सर्व बाबींकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, गरमसूर येथे सफारी गेट उभारून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष दिलीप सलाम, सचिव गजानन डोंगरे, सरपंच सुलेचना राऊत, सुरेश शेंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





