
निसर्गाचे सौंदर्य वाढविणारा पळस बहुगुणीच
आयुर्वेदात पळसाच्या फुलांचे महत्त्व विषद
सेलू –
सध्या सौम्य उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी सकाळच्या वेळी थंडीची हलकी जाणीव अजूनही होत आहे. शिशिर ऋतू मावळत असताना वसंत ऋतूने हळूहळू बहरायला सुरुवात केली आहे. या ऋतू परिवर्तनात ठिकठिकाणी पळसाची झाडे नाविन्यपूर्ण व मनमोहक रंगांची उधळण करताना दिसत आहेत.
पळस म्हणजेच रानाचा अग्नी! इंग्रजीत याला Flame of the Forest असे संबोधले जाते. वसंतात फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सेलू तालुक्यातील जखाळा शिवारात बहरलेली पळसाची झाडे निसर्गप्रेमींना मोहवून टाकत आहेत.
उन्हाळा सुरू झाला की बहुतांश झाडांची पाने गळून निष्पर्ण सांगाडे दिसू लागतात. मात्र अशा वेळी पळसाचे झाड मात्र पानगळीनंतर अधिक उठून दिसते. काळसर कळ्यांपासून उमलणारी तेजस्वी लाल-केसरी फुले झाडाला अनोखी शोभा देतात. क्वचित पिवळी व पांढरी फुलेही आढळतात. या फुलांना गंध नसला तरी त्यांच्या रंगाची मोहिनी विलक्षण असते. पळस फुलला की संपूर्ण जंगल लाल-केसरी रंगात न्हाऊन निघते. फुलांतील मधासाठी विविध पक्षी झाडावर गर्दी करताना दिसतात.
ग्रामीण भागात पूर्वी पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठी केला जात असे. “पळसाला पानं तीन” ही मराठीतील म्हण प्रसिद्ध आहे. त्या त्रिदली पानांना धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. यज्ञकुंडात पळसाच्या बारीक फांद्या समिधा म्हणून वापरल्या जातात.
इतिहासात “प्लासीची लढाई” म्हणून प्रसिद्ध असलेली घटना पळसाच्या जंगलाशी संबंधित आहे. पळसाच्या फुलांना पाण्यात भिजवून नैसर्गिक भगवा रंग तयार केला जातो. पूर्वी ग्रामीण भागात रंगपंचमीसाठी याच नैसर्गिक रंगांचा वापर होत असे. आज बाजारात कृत्रिम रंग उपलब्ध झाल्याने या परंपरेत घट झाली असली तरी निसर्गाची ही रंगपंचमी मनाला भुरळ घालणारी ठरते.
आयुर्वेदात पळसाचे विशेष स्थान आहे. पळसाच्या बियांचे तेल त्वचारोगांवर उपयुक्त मानले जाते, डिंक शक्तिवर्धक समजला जातो, तर फुले व साल विविध औषधी उपचारांमध्ये वापरली जातात. काही ठिकाणी पळसाचे लाकूड बांधकामातही वापरले जाते.
काळाच्या ओघात कृत्रिम साधनांमुळे पळसाकडे दुर्लक्ष झाले असले तरी त्याचे नैसर्गिक, सांस्कृतिक व औषधी महत्त्व आजही अबाधित आहे. वसंताच्या आगमनाची साक्ष देणारा पळस सध्या निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.





