Home Breaking News दिड हजार सिंदीकरांनी केली रक्ताची शाई

दिड हजार सिंदीकरांनी केली रक्ताची शाई

84

सरकारला जाब : ग्रामीण रुग्णालय द्या, नाहीतर लढा आणखी तीव्र आंदोलन करू

सिंदी (रेल्वे):

टाळ-मृदंगाचा गजर झाला, निवेदने दिली, आश्वासने ऐकवीली पण सरकार हलले नाही. अखेर संतापलेल्या सिंदीकरांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. तीन दिवस चाललेल्या या आंदोलनात १५३७ सिंदीकरांनी रक्ताची शाई करून आमच्या जिवाशी खेळ थांबवा ग्रामीण रुग्णालय द्या, अशी मागणी केली आहे.

पालीकेचे शहर असूनही सिंदीत सक्षम आरोग्यसेवा नाही, ही वस्तुस्थिती संतापजनक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे; पण गंभीर रुग्णांना उपचारासाठी मैलोनमैल धाव घ्यावी लागते. अनेक वेळा उपचाराच्या विलंबामुळे रुग्णांनी प्राण गमावले, तरी शासनाला जाग आली नाही. आमदार, खासदार, मंत्र्यांना वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय नाही. आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्षात कोरडी जमीन अशी अवस्था सिंदीकरांची झाली आहे.

पुढे भिक मागो आंदोलन करू

शासनाने आताही या मागणीची दखल घेतली नाही तर येत्या काळात भिक मांगो आंदोलन करू असा इशारा सिंदीकरांनी यावेळी दिला. या आंदोलननात आसपासच्या गावांतील नागरिकांना सहभागी करून ते आणखी व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या पर्वावर रक्तातून शब्द उमटवण्याचा निर्णय झाला. गुरुवारी ५३७ जणांनी, तर शुक्रवारी ५०८ जणांनी तर शनिवार ४९२ जणांनी दहा मिलिलिटर रक्त काढून पत्र लिहिले. तीन दिवसांत तब्बल एक हजार ५३७रक्तपत्रे शासनाला पाठवण्यात आली. तीन दिवसीय आंदोलनाचा स्वयंस्फूर्त सहभागाने आंदोलन स्थळी चक्क मतदानासारख्या रांगा लागल्या होत्या.

पत्र लिहीण्यासाठी रक्त देताना खासदार अमर काळे, अतुल वांदिले व अन्य नागरिक, खासदारांनी दिले रक्त

या आंदोलनात खासदार अमर काळे आणि राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी भेट दिली. सिदीकरांच्या या मागणीकरिता स्वरक्ताने पत्र लिहुन आंदोलनात सहभागी झाले. सोबतच माजी आमदार राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी आदी मान्यवरांनी भेटी देऊन समर्थन दिले.