
सेलू :–
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन, सेलू (जि. वर्धा) यांच्या वतीने UGC Regulation Act 2026 च्या समर्थनार्थ देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन सेलूच्या तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले असून, संबंधित विधेयक महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहराध्यक्ष सुरज माहुरे व तालुका उपाध्यक्ष दिलीप पोहाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी संजय कोपरकर, किशोर डकरे, मनोज वांदीले, तेजस शेंडे, श्रीकांत ढगे, गणेश घाटुर्ले, उमेश तडस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, १५ जानेवारी २०२६ पासून लागू झालेल्या UGC Regulation Act 2026 अंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रात एससी-एसटीप्रमाणेच महिला, ओबीसी व दिव्यांग घटकांना समानता समितीत प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा भेदभाव आणि अन्याय कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ओबीसी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढविणे, शैक्षणिक संस्थांमध्ये पारदर्शकता आणणे आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणे या दृष्टीने हे विधेयक महत्त्वपूर्ण ठरेल, असेही संघटनेने स्पष्ट केले.
नायब तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून ते पुढील कार्यवाहीसाठी संबंधित स्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.





