
सेलू :–
सेलू तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जन्म नोंद (Birth Certificate) ची नक्कल मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांकडून अधिकृत शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “पैसे दिले तर काम तात्काळ, अन्यथा वारंवार चकरा” असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.
रेकॉर्ड रूममध्ये एजंटांचा उघड वावर असून, अधिकृत कर्मचाऱ्यांपेक्षा एजंटच कामे ‘सुरळीत’ करून देत असल्याची चर्चा आहे. सामान्य नागरिक तासन्तास रांगेत उभे, तर एजंटमार्फत आलेल्या फाइल्स झटपट मार्गी—अशी स्थिती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जन्म नोंदीची नक्कल ही निश्चित शुल्कात व ठराविक वेळेत देणे बंधनकारक असताना, मुद्दाम विलंब करून ‘सुविधा शुल्का’ची मागणी होत असल्यास ते गंभीर गैरप्रकार ठरतात. नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवण्यासाठी तात्काळ चौकशी व जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, “एजंटराज” थांबवून कामकाज पूर्णपणे पारदर्शक करावे, अशी सर्वसामान्यांची ठाम मागणी आहे.





