Home Breaking News चणा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; पिक पिवळेपडू लागल्याने शेतकरी चिंतेत

चणा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; पिक पिवळेपडू लागल्याने शेतकरी चिंतेत

194

मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )

सेलू : –

तालुक्यातील अनेक गावांमध्ये रब्बी हंगामातील चण्यावर रोगाचा प्रादुर्भाव पाहता पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अचानक पिक पिवळे पडू लागल्याने शेतकरी वर्गात तीव्र चिंता निर्माण झाली आहे. पेरणीपासून चांगली वाढ झालेल्या चणा पिकावर ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या अनेक शेतांमध्ये चणा पिकाची पाने पिवळी पडत असून, काही ठिकाणी झाडे वाळण्याच्या अवस्थेत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल, रात्रीची वाढलेली दववृष्टी, जमिनीत अति ओलावा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे हे नुकसान होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चणा हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असून, यंदा उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी धरली होती. मात्र पिक पिवळे पडू लागल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढलेली खत, बियाणे व फवारणीची खर्चीक लागवड आणि त्यातच हे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.याबाबत झोपी गेलेल्या तालुका कृषी विभागाकडून कोणतेही सहकार्य लाभले नाही.

दरम्यान, कृषी विभागाने तातडीने शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून रोगाचे नेमके कारण शोधावे, तसेच योग्य औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत व नुकसान भरपाई जाहीर करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.